बातमीपत्र

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची भर पडल्याने प्रशासनावर मोठा ताण

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकाच दिवसामध्ये 52 कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची भर पडल्याने प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला आहे. मुंबई, पुणे येथील रेड झोनमधून मोठ्या संख्येने जिल्ह्यात चाकरमानी आल्यामुळे अचानकपणे रुग्णांची वाढ झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाच्या वतीने योग्य पध्दतीने नियोजन सुरू आहे. यामध्ये राधानगरी तालुक्यातील 4 रुग्णांची वाढ झाल्याने तालुक्यातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे.याबाबत तहसील कार्यालय राधानगरी येथे मा.आमदार प्रकाश आबिटकर यांनी तहसीलदार सौ.मीनाताई निंबाळकर यांच्या सोबत आढावा घेतला. जिल्ह्यात येणारी ही सर्व मंडळी आपल्या कटुंबाच्या उदर निर्वाहासाठीच नोकरी- व्यवसाया निमित्ताने पुणे, मुंबई येथे गेले असल्यामुळे त्यांच्याकडे अपराधी नजरेने 'न' पहाता सर्वांनी सहकार्याची भावना ठेवावी जेणे करून या सर्व मंडळींना आधार मिळेल.
तालुक्यातील कारीवडे पैकी राणोशेवाडी येथे 2 रुग्ण, डिगस येथे 1 व वाकीघोल गावठाण मध्ये 1 रुग्ण आढळल्याने नागरीक भितीच्या छायेखाली आहेत.आरोग्य,महसूल व पोलीस यंत्रणेकडून सदर गावांच्या हद्दी बंद केल्या असून या पॉझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब प्रशासनाकडून घेण्यात आले असून नागरीकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडून येणाऱ्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे असे प्रतिपादन राधानगरी तालुका तहसीलदार सौ. मीनाताई निंबाळकर व आमदार प्रकाश आबिटकर यांनी यावेळी केले.  


आमच्यात सामील व्हा