श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय आडोली शाळा राधानगरी अभयारण्याच्या अति दुर्गम भागात आहे. इयत्ता ५ वी ते १० वी च्या वर्गात एकूण २६२ विद्यार्थी दररोज १० ते १२ किलोमीटर पायपीट करून शिक्षण घेत आहेत.या शाळेत अनेक नवोपक्रम राबविले जातात.यातील एक उपक्रम म्हणजे रानभाज्या चे प्रदर्शन.
सध्या भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी अमर्यादित प्रमाणात रासायनिक द्रव्यांचा वापर होत आहे.यामुळे गंभीर शारीरिक व मानसिक आजारांना आपण बळी पडत आहोत.जेनेटिकली मोडीफाईड संकरित बियाणे, आणि विकसित वाणांच्या गर्दीत आपण आपले रानभाज्याचे धन व मूळ स्वरूप हरवू नये.आपले आरोग्य जपण्यासाठी विषमुक्त,नैसर्गिक रान भाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे या उद्देशाने श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय आडोली शाळेत रानभाज्या प्रदर्शन घेण्यात आले.या प्रदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य श्री.सुहास वायगणकर यांचे मार्गदर्शन लाभले.या प्रदर्शनाचे उद्घाटन आडोली गावचे जेष्ठ नागरिक श्री.दत्तात्रय ढोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.आडोली आणि आसपासच्या१२ वाड्या मधील ५४ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.या विद्यार्थिनी आपल्या आज्जी आणि आजोबा सोबत जंगलात गेल्या.भांगरुटटाकळा, पात्री,शेंडवेल,केना यासारख्या २४ प्रकारच्या रानभाज्या संकलित केल्या.या उपक्रमात शाळेच्या विद्यार्थिनीनी घरी येऊन आई आणि आज्जी ची मदत घेऊन पाक कृती आत्मसात केली.पाक कृतीचे लेखन केले,तसेच प्रदर्शन वेळी तयार करण्यात आलेल्या रानभाज्यांचे आरोग्य विषयक फायदे सांगितले.मुख्याध्यापक श्री.व्ही.पी.पाटील यांनी सांगितले की जुन्या पिढीला या रान भाज्यांची माहिती आहे ती आताच्या पिढीला कळली पाहिजे,यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.पावसाळ्याचे ४ महिने हा नैसर्गिक ठेवा मिळण्याचा कालावधी आहे.त्यामुळे याचे संवर्धन व्हावे.या प्रदर्शनास श्री.डी.एन.पाटील सर,विद्यार्थी,पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
