आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने सन्मानित झालेला भांडुपचा तरुण सिव्हिल इंजिनियर गेले 2 वर्षे सातत्याने कोव्हीड रुग्ण आणि नातेवाईकांची सेवा करत आहे. 500 मोफत ऑक्सिमीटर, 100 कुटुंबियांना मोफत अन्नधान्य वाटप, मोफत ऑक्सिजन काँसंट्रेटर सेवा यासारखे अनेक सेवादायी उपक्रम विशाल कडणे यांनी स्वतःच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे मोडून राबवले. कोव्हीडमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या कमावत्या पालकांनी प्राण गमावले आणि मग त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली अशा अनेक कुटुंबीयांनी विशाल कडणे यांना संपर्क साधून त्यांच्या पाल्यांच्या फीचा आर्थिक प्रश्न मांडला. सदर विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन विशाल कडणे आणि त्यांचे सहकारी आज अनेक विद्यार्थ्यांची फी स्वतः हुन पुढाकार घेऊन भरत आहेत. पालक गमावलेला एक ही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ह्या ध्येयाने झपाटलेल्या विशाल कडणे आणि टीमने आज भांडुप येथे मिस टुरिसम युनिव्हर्स 2021 विजेती श्रिया परब हिच्या हस्ते विद्यार्थ्यांना त्यांच्या ह्या टर्मच्या फी रकमेचे चेक अदा केले. आतापर्यंत एकूण 26 विद्यार्थ्यांची फी अदा केली असून हा मदतीचा रथ अविरत सुरु राहण्यासाठी समाजातील प्रत्येकानेचं पुढाकार घ्यावा असे आवाहन विशाल कडणे यांनी केले आहे.
