विभागीय वन अधिकारी, वन्यजीव, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली, वनपरिमंडळ वन्यजीव आडोली अंतर्गत पानवट्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. उन्हाळ्यात नैसर्गिक जलस्रोतांमधील पाणी कमी झाल्याने वन्यजीवांना पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यांना त्यांच्या अधिवासातच पाणी उपलब्ध व्हावे आणि पाण्याच्या शोधात वन क्षेत्राबाहेर येण्याची गरज कमी व्हावी, या उद्देशाने ही मोहीम राबवली गेली. मोहीमेदरम्यान पानवट्यांमधील गाळ काढून त्यांची स्वच्छता करण्यात आली आणि पाणी साठवण्याची व्यवस्था केली गेली. या उपक्रमात वन कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. श्री. संजय शिवाजी पोवार, वनपाल वन्यजीव अडोली वनरक्षक श्री. आर. के. सुतार, श्री. विष्णू मस्के, सौ.अश्विनी केकान, श्री. शिभम गणपती पाटील, तसेच सर्व वनसेवकांनी या कामात योगदान दिले. पाण्याचे व्यवस्थापन, नाले-ओढ्यांतील पाणी अडवून साठवणे आणि वन्यप्राण्यांना पाणी पुरविणे या दिशेने प्रयत्न झाले. या उपक्रमामुळे वन्य प्राण्यांना अधिवासातच पाणी उपलब्ध होऊन मानव- वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होईल.
