कारेगाव:-लोणार तालुक्यामधील सुलतानपूर येथील घटना व्यवसायाची स्वप्ने राख; कर्ज फेडायचे कसे? दोन कष्टकरी कुटुंबे हवालदिल, नियमानुसार मदत देण्याची होते मागणी!
आधी दुष्काळाचे संकट,त्यात आता आगीचा वज्राघात! सुलतानपूर येथील जालना रोडलगत शनिवारी पहाटे दोन दुकानांना भीषण आग लागून लाखोंचा माल, फर्निचर व मशिनरी जळून खाक झाली. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ८७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याने दोन कष्टकरी कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
पहाटे साडेपाचच्या सुमारास दुकानांतून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच दुकानदार घटनास्थळी पोहोचले; मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. अंबादास बळीराम जुमडे यांच्या मालकीच्या जागेतील तुळजाभवानी साडी सेंटरचे सुमारे ४२ लाख, तर सतीश मशिनरीजचे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुकानांतील महत्त्वाची कागदपत्रे, बँकेचे धनादेश व इतर दस्तऐवजही जळून खाक झाले.
शॉर्टसर्किटचा संशय; अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न
वीज वाहिनीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.दोन अग्निशमन दलांना माहिती देऊनही वाहने वेळेवर पोहोचली नसल्याची,तसेच एका वाहनाच्या पाण्याच्या पंपात तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार नागरिकांनी केली.घटनेची माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश जाधव, ग्रामपंचायत अधिकारी नंदकिशोर तेजनकर व महसूल ग्राम अधिकारी पवन बोडखे यांनी घटनास्थळी पाहणी करून अहवाल दिला.
ऐन दुष्काळात व्यवसायच उद्ध्वस्त झाल्याने कर्जाचे हप्ते फेडायचे कसे आणि पुन्हा व्यवसाय उभा करायचा कसा?या चिंतेने संबंधित कुटुंबे हवालदिल झाली आहेत.आगीचे नेमके कारण शोधून सखोल चौकशी करावी आणि नियमानुसार मदत मिळवून द्यावी अशी मागणी अंबादास जुमडे यांनी केली आहे.
