बातमीपत्र

सुलतानपुरनगरीत विजयादशमीच्या सोनेरी मुहूर्तावर ग्रामरत्न पुरस्कारांचा गौरव सोहळा

सुलतानपुरनगरीत विजयादशमीच्या सोनेरी मुहूर्तावर ग्रामरत्न पुरस्कारांचा गौरव सोहळा

 
वाचनऋषी मोईन काबरा व कर्मयोगी वामनराव राजगुरू सन्मानित; मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
 
दसरा वाटिकेत ज्ञान आणि सेवाभावाचा जागर; समस्त कष्टकरी संघाच्या उपक्रमाने सुलतानपुरात सांस्कृतिक चैतन्य
 
कारेगाव :- २२ ऑक्टोंबर रोजी विजयादशमी म्हणजे केवळ सोनं लुटण्याचा सण नव्हे, तर सत्कर्माचे, सत्साहित्याचे आणि सद्विचारांचे सोने वाटण्याचा मंगल दिवस! याच सोनेरी मुहूर्तावर सुलतानपूर येथील दसरा वाटिकेत ज्ञान, संस्कृती आणि सेवाभावाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. कष्टकरी संघाच्या वतीने आयोजित ‘ग्रामरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान सोहळा उत्साहपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडला. यावेळी वाचनसंस्कृतीचा ध्यास जोपासणारे वाचनऋषी मोईन हारुण काबरा (कच्छी) आणि आपल्या कर्तृत्वातून आदर्श निर्माण करणारे कर्मयोगी वामनराव जनार्दन राजगुरू यांना ग्रामरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
 
गावाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्याने सुलतानपूरच्या सांस्कृतिक परंपरेला उजाळा दिला. कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा कष्टकरी संघाचा हा उपक्रम ग्रामस्थांच्या कौतुकाचा विषय ठरला.
ग्रामरत्न पुरस्कारांचे वितरण सरपंचपती डॉ. हेमराज लाहोटी, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष वामनराव झोरे, माऊली मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष संजय लाहोटी, श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. वसंतराव देसाई, राष्ट्रीय सेवा संघा सदभावना मंचाचे शांतीलाल बोराळकर, संतकृपा समूहाचे वसंत जुमडे, आश्रुबा भानापुरे, गजानन भानापुरे, गोविंद रिंढे, राजेश पिंपरकर, मनोहर भानापुरे, महेंद्र पनाड, अर्जुनराव रिंढे, प्रल्हाद टकले, डॉ. विनोद भानापुरे आणि साहेबराव झोरे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान पुरस्कार्थी च्या कार्याचा आढावा प्रास्ताविकाच्या माध्यमातून कष्टकरी संघाचे अध्यक्ष सागर पनाड यांनी केले, तर सूत्रसंचालन वैभव टकले यांनी केले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सुभाष खेत्रे, संजाब खरात, दामोदर लाहोटी, मधुकर भानापुरे, ज्ञानेश्वर हरकाळ, गणेश रत्नपारखी आदीं सह पोहेकॉ. शिवानंद केदार व राजेश जाधव 
 उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्टकरी संघाचे संघटन सचिव भाऊराव भालेराव यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी माजी सरपंच सुखदेवराव देसाई यांनी आभार प्रदर्शन करून सोहळ्याचा समारोप केला.
आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या पडद्यामध्ये तरुणाई गुंतलेली असताना ग्रंथांच्या पानांतून ज्ञानाचे विश्व शोधणारे मोईन हारुण काबरा हे सुलतानपूरचे भूषण ठरले आहेत. वाचन ही केवळ आवड नसून ती एक साधना आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
 
पुस्तकांच्या सहवासातून ज्ञानाची ज्योत तेवत ठेवत त्यांनी वाचनसंस्कृतीचा ध्यास जोपासला. त्यांच्या अखंड ज्ञानसाधनेची दखल राज्यस्तरावर घेतली गेली असून, त्यांच्या यशामुळे सुलतानपूरच्या लौकिकात भर पडली आहे. वाचनाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या त्यांच्या कार्याचा गौरव करत कष्टकरी संघाने त्यांना ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित केले तर
सामान्य कुटुंबातून पुढे येत आपल्या कर्तृत्वाने आदर्श निर्माण करता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे वामनराव जनार्दन राजगुरू. कष्ट, प्रामाणिकपणा आणि माणुसकी या मूल्यांच्या आधारावर त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली आहे.
कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीपासून दूर राहून आपल्या कार्यातून आदर्श निर्माण करणारे राजगुरू यांचे व्यक्तिमत्त्व आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचा सोज्वळ स्वभाव, प्रामाणिक वृत्ती आणि समाजाप्रती असलेली निष्ठा हीच त्यांची खरी श्रीमंती आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणजे गावातील संस्कार, माणुसकी आणि सेवाभावाचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजनासोबतच ज्ञान आणि विचारांचे प्रतीक असलेल्या शास्त्रपूजनालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच विचारातून समस्त कष्टकरी संघाने दसऱ्याच्या मंगल पर्वावर कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याची परंपरा जपली आहे.
गावाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळवून देणे, हा या पुरस्कारामागील उदात्त हेतू आहे.
 
‘कर्तृत्वाचा सन्मान म्हणजे गावाच्या भविष्याला दिलेली प्रेरणा’ या भावनेतून प्रदान करण्यात येणारा ग्रामरत्न पुरस्कार हा केवळ दोन व्यक्तींचा गौरव नसून सुलतानपूरच्या समृद्ध संस्कृतीचा, वाचनपरंपरेचा आणि सेवाभावाचा सन्मान आहे.
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पार पडलेल्या या सोहळ्याने सुलतानपूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात प्रेरणादायी पर्वाची भर घातली. कर्तृत्वाचा सन्मान आणि समाजहिताच्या कार्याला प्रोत्साहन देणाऱ्या समस्त कष्टकरी संघाच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक 
करण्यात आले.


आमच्यात सामील व्हा