वाशीम कारंजा येथील बी.एस.एफ. चे सैनिक सुनिल धोपे यांचा 15 सप्टेंबर रोजी मृत्यु झाला. सुनिल धोपे यांचा मृत्यु झाला नसून त्यांचा घातपात झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाबाबत खासदार भावनाताई गवळी यांनी 17 सप्टेंबर रोजी कारंजा येथे धोपे कुटुंबियांची भेट घेवून त्यांना सांत्वना दिली. तसेच त्यांच्याशी चर्चा करुन धोपे यांच्या मृत्युसंदर्भात माहिती घेतली. सदरच्या मृत्यु प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी आपण केंद्र सरकारकडे केली असल्याचे यावेळी खा. गवळी म्हणाल्या. यावेळी माजी आमदार प्रकाशदादा डहाके, जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, गजानन देशमुख व शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान स्व. सुनिल धोपे यांच्या हत्येच्या निषेधार्थ 19 सप्टेंबर रोजी वाशीम शहर बंद ठेवण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले असून सदरचा बंद हा शांततेत पाळण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
