प्रतिनिधी - भांडुप मधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भांडुपमधील गृहनिर्माण संस्था सभासदांनी मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनकडे मार्गदर्शनपर ऑनलाईन सत्राची मागणी केली होती. त्या अनुषंगाने गृहनिर्माण संस्थांचा महासंघ असलेल्या मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने १२ जुलै रोजी तज्ञ वक्त्यांच्या मार्गदर्शन सत्राचे ऑनलाईन आयोजन तज्ञ संचालक विशाल कडणे यांनी केले होते. त्या सत्रास प्रमुख पाहुणे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते श्री प्रविण दरेकर आणि खासदार मनोज कोटक उपस्थित होते. सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक श्री आशिष जाधव, आ. श्याम सावंत, ऍडव्होकेट डी एस वडेर, सहकार तज्ञ वसंतराव शिंदे, डॉ प्रमोद जाधव, डॉ रेणू अग्रवाल, महापालिका पॅनल वरील सल्लागार विशाल कडणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी, ऍड. कल्पना जोशी, दीपक दळवी, रितेश शाम सावंत, प्रवीण दहितुले यांनी देखील आपापल्या परीने उपस्थितांना मार्गदर्शन केले. ऑडिट, वार्षिक सभा, इत्यादीबाबत फेडरेशनने प्रशासन दरबारी केलेल्या कार्याची माहिती अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये दिली. सदर चर्चा सत्रामध्ये गृहनिर्माण संस्थांना भेडसावणाऱ्या घर कामगार, कर्मचाऱ्यांचे पगार, भाडेकरार, अभ्यागतांना सोसायटी आवारामध्ये प्रवेश देणे, आरोग्य विषयक सल्ला मसलत इत्यादी अनेक समस्यांवर चर्चा केली गेली. ईशान्य मुंबई विभागामधील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कार्य फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम चाललेले असून लोकडाऊनच्या काळात भाजीपाला पुरवठा, निर्जंतुकीकरणाची मोहीम, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहन व्यवस्था, मोफत धान्यवाटप इत्यादी कार्याबद्दल विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी विशाल कडणे आणि सहकाऱ्यांचे कौतुक केले. आपल्या भाषणात उत्तर देताना खासदार मनोज कोटक यांनी जिथे जिथे गरज पडेल तिथे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य तपासणी किट आणि निर्जंतुकीकरणाची अतिरिक्त यंत्रणा पुरवणार असल्याचे सांगितले. सध्याच्या काळात एकमेकांच्या संपर्कात राहून व्हाट्स अप ग्रुप निर्माण करून सर्व भांडुप मधील गृहनिर्माण संस्थांना एका छत्राखाली आणण्याबाबतच्या खा. कोटक यांच्या सूचनेने सर्व सभासदांचे मन जिंकून घेतले. तातडीच्या परीस्ठीतीमध्ये आरोग्य विषयक सेवा पुरवण्याकरता हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून ईशान्य मुंबई विभागामध्ये वॉर रूम उघडण्यात यावा आणि त्यासाठी सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन खा. मनोज कोटक यांनी दिले. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून घेण्यासाठी आम्ही बांधील असल्याचे आश्वासन संयोजक विशाल कडणे यांनी दिले . डॉ. ज्ञानेश्वर महाजन यांनी आभारप्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली.
