प्रतिनिधी - पवईतील हिरानंदानी येथील एमटीएनएल ट्रेनिंग सेंटरच्या मागे असलेल्या एमएमआरडीएच्या इमारतींमध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये एस वार्डमधील विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग, पवई या भागातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. २२ मजली असलेल्या या इमारतींमध्ये १६५० नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर ठिकाणी जेवण पुरवण्याची जबाबदारी ज्योती महिला आद्योगिक उत्पादक सेवा संघ यांना देण्यात आली होती. परंतु त्यांच्या अन्न बनविणे व पुरविणे बाबतीतील समर्थतेबाबतीतील त्रुटी आज प्रशासनाच्या चाणाक्ष नजरेमुळे पहिल्याच दिवशी निदर्शनास आल्या. सकाळचा नाश्ता व जेवण पोचण्यास उशीर होणार असल्याचे क्वारंटाईन सेंटर प्रमुख सुशांत रत्नपारखी यांच्या लक्षात येताच ताबडतोब त्यांनी पर्यायी व्यवस्था उभी केली. त्याचबरोबर क्वारंटाईन सेंटरमध्ये लहान मुले, मधुमेहग्रस्तांसाठी त्यांनी तातडीने बिस्किटांची देखील व्यवस्था केली. संपूर्ण परिस्थीचा नीट आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था काय आणि कशी करता येईल याबाबत आपल्या वरिष्ठानां कळविले. याची दखल घेत सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी ताबडतोब दुसऱ्या कंत्राटदाराला काम देऊन विलगीकरण कक्षातील लोकांना जेवण देण्याची सोय केली. अभियंता विजयकुमार सोनार यांनी देखील मोलाचा वाट उचलून नाश्ता व जेवणाची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी महत्वाची जबाबदारी पार पाडली. अशा अटीतटीच्या प्रसंगी महापालिका अधिकाऱ्यांनी समयसूचकतेने घेतलेल्या निर्णयामुळे पवई क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना जेवण व नाश्त्याची सोय यशस्वीपणे करण्यात आली. या संपूर्ण घटनेमध्ये महापालिकेची समयसूचकता आणि नागरिकांच्या प्रती आत्मीयता दिसून आली. सदर प्रसंगाची दखल घेत पवई क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांनी सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे आणि त्यांचे अधिकारी सुशांत रत्नपारखी यांचे आभार मानले आहेत. एस विभागातील नागरिकांनी क्वारंटाईन सेंटर प्रमुख सुशांत रत्नपारखी यांचे कौतुक केले आहे आणि त्याचबरोबर ज्योती महिला आद्योगिक उत्पादक सेवा संघ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.
