प्रतिनिधी - दिनांक १२ जुलै रोजी मुंबईमध्ये विशाल कडणे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या हाऊसिंग सोसायट्यांच्या ऑनलाईन महामेळाव्यामध्ये अनेक गृहनिर्माण संस्था सदस्यांनी ऑक्सिजन लेव्हल चेक करणे व त्यासाठी ऑक्सिमीटर मिळणे बाबत सन्मा. खासदार मनोज कोटक यांच्याकडे मागणी केली होती. खासदार मनोज कोटक यांच्या सूचनेनुसार मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनचे संचालक विशाल कडणे आणि सहकारी यांनी सामाजिक जबाबदारी जपत एक कर्तव्य म्हणून स्वखर्चाने जितके शक्य होईल तितकी जबाबदारी उचलण्याचे ठरवले होते. त्यानुसार आपल्या विभागामधील गरजू व्यक्तींची, गरजू संस्थांची यादी सामाजिक संस्थांकडून घेऊन तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सदर व्यक्तींना व संस्थांना मोफत ऑक्सिमीटर देण्याचे काम गेले चार महिने विशाल कडणे आणि त्यांचे सहकारी करत आहेत. हि सर्व मंडळी सुशिक्षित तरुण मंडळी असून दिवसभर आपला नोकरी धंदा सांभाळायचा आणि संध्याकाळी ऑक्सिमीटर वाटप करायचे असा त्यांचा नित्य उपक्रम सुरु आहे. सदर उपक्रमासाठी डॉ. प्रमोद जाधव, डॉ गिरीश पिंगळे, डॉ. शशांक, नगरसेविका साक्षी दळवी, ऍडव्होकेट कल्पना जोशी, रितेश सावंत, गौरव पोतदार, अश्विन तर्पे, शीतल भुवड, किरण गायचोर इत्यादी कोरोना योद्ध्यांचे महत्वपूर्ण योगदान लाभत आहे. सदर ऑक्सिमीटर वाटपासाठी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सहकार नेते शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर आणि मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी मोलाचे सहकार्य केले असून सर्व लाभधारकांनी त्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. विशाल कडणे हे मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनचे तज्ञ संचालक असून त्यांनी यापूर्वी ५००० मास्कचे मोफत वाटप विभागामध्ये केले आहे.कोरोना रुग्नांप्रती असलेली आस्था आणि कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाचे चालू असलेले प्रयत्न याला कुठेतरी सुशिक्षित तरुणांचा हातभार लावावा ह्या प्रामाणिक अपेक्षेने हा उपक्रम हाती घेतल्याचे विशाल कडणे यांनी सांगितले.
