दि ७ सप्टेंबर : महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत फेरीवाल्याने जीवघेणा हल्ल्या केला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पिंपळे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत हल्लेखोर अनधिकृत फेरीवाल्यावर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. आता ठाण्यातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आता दयामाया नाही, फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचे लोकार्पण आज करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांच्या मु्द्द्याला हात घातला.फेरीवाल्यांवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेचा उल्लेख केला. घटना लक्षात घेता आता पुढील काळात आपल्याला कठोर कायदा राबवावा लागेल.
आता दया-माया, क्षमा दाखवताच येणार नाही. नागरिक, माता-भगिनी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आपल्यावर आहे. आता कुठेही हयगय करून चालणार नाही. केवळ स्कायवॉकच नाही, तर इतरही ठिकाणी फेरीवाल्यांचा उच्छाद असेल तर तो उच्छाद आपल्याला आटोक्यात आणावाच लागेल. आता आपल्याला त्या दिशेने काम करावे लागेल, असे मुख्यमंत्री कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
