मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या दोन अडीच महिन्यांवर आली असली तरी आरक्षण, व प्रभाग रचना जोपर्यंत जाहीर होत नाही ,तोपर्यंत आजी माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांना कोणत्या पक्षाचे तिकीट मिळवायचे यासह "इलेक्शन प्लॅनिंग "करता येत नसल्याने सर्वकाही तळ्यात-मळ्याततच असून निवडणूक आयोगाच्या परिपत्रकाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मुख्य राजकीय पक्षांसह छोट्या-मोठ्या पक्षांसह अपक्षांनीही तयारी केलेली आहे. परंतु ,निवडणूक प्रक्रिया अद्यापही आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या निर्णयातच अडकलेली आहे. मात्र ,यावेळी निवडणूक लढवायचीच यावर ठाम असलेल्यांनी तिकीटासाठी" गॉड फादर"कडे मोर्चे बांधणी पासून अगदी प्रचार फेरीपर्यंतचीही तयारीही पूर्ण करून ठेवली आहे. अशा उमेदवारांची संख्या मोठी असून दिवाळी पासूनच अनेकांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाढदिवस, फराळ स्नेहमेळावा, सहली, रिसॉर्ट पॅकेज, जेवणाची व्यवस्था, यासह विविध कार्यक्रम राबवण्यात सुरुवात झालेली आहे. परंतु गेल्या महिन्यापासून या सर्व गोष्टींच्या चर्चा असल्या तरी निवडणुकीच्या तारखा व प्रभाग जाहीर होत नसल्याने निवडणुका पुढे जाणार की वेळेत होणार? याबाबत संभ्रम असल्याने काहींनी आपले हात आखडते घेण्यास सुरुवात केलेली आहे .तसेच निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम ,प्रभाग रचना, व तारखा जाहीर करत नसल्याने काही नवीन चेहरे पुन्हा गायब होऊ लागले आहेत. त्यामुळे ,प्रभाग व तारखा जाहीर होत नाहीत, तोपर्यंत राजकीय पक्षांसह अनेक इच्छुक आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवणार असल्याचे स्पष्ट आहे .
भांडुप विधानसभा क्षेत्रातील "एस" विभागातील नगरसेवकांची संख्या १४ असून शिवसेनेचे ९ नगरसेवक आहेत .त्यांचे चांगले प्राबल्य असले तरी भारतीय जनता पक्ष (३, )व काँग्रेसने (१,) यावेळी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर मनसे व राष्ट्रवादी(१) आपली ताकद आजमावू शकते. महाविकासआघाडी की स्वबळ याबाबत कोणताही निर्णय होतो, यावरही बरेच काही अवलंबून आहे .याच कारणातून अनेक जण अपक्ष लढवण्याच्या तयारीत आहेत .सर्वच पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते एकमेकांना चांगले परिचित असताना त्याची जवळची "नातीगोती"ही आहेत. त्यामुळे प्रत्येक "इच्छुक" आपल्या मतांची गोळाबेरीज करीत निवडणुकांची" गणिते "आखली जात आहेत. असे असले तरी "भक्कम" व "सक्षम" उमेदवारांलाच कोणताही पक्ष तिकीट देणार हे निश्चित आहे.
