प्रतिनिधी - कोरोना काळात देवदूत ठरलेल्या भांडुपच्या डॉ प्रकाश राणे यांच्या दवाखान्यामध्ये आज मोफत अस्थी रोग संबंधित शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बोन डेन्सिटी टेस्ट ह्या महागड्या अश्या हाडांची गुणवत्ता तपासणी करणाऱ्या चाचणीचे आयोजन विभागातील गरजू नागरिकांसाठी यशवंत हेल्थ केअरच्या माध्यमातून डॉ प्रकाश राणे यांनी मोफत केले होते. ह्या शिबिरास सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ विपुल शेट स्वतः नागरिकांची तपासणी करण्याकरता उपस्थित होते. शिबिरामध्ये प्रत्येक उपस्थित नागरिकांची बोन डेन्सिटी टेस्ट करण्यात आली, त्यानंतर डॉ विपुल शेट यांनी प्रत्येक उपस्थितीच्या चाचणी अहवालाची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित नागरिकांना तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत व्हिटॅमिन्स, कॅल्शियम व अन्य आवश्यक औषधे आणि गोळ्या देण्यात आल्या. शिबिरास डॉ शिवम सिंग, डॉ प्रसाद पडवळ, शिवमंगल पांडे, संजीव सिंग इत्यादी मान्यवरांचे सहकार्य लाभले. शिबिरचा लाभ ३५० हुन अधिक नागरिकांनी घेतला. डॉ प्रकाश राणे यांनी आयोजित केलेल्या ह्या शिबीरामुळे अनेक नागरिकांना डॉ विपुल शेट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि रोगाचे निदान होण्यास मदत झाली असे उपस्थितांनी सांगितले. विभागातील नागरिकांनी ह्या उपक्रमाबद्दल डॉ प्रकाश राणे ह्यांचे मनापासून आभार मानले.
