हुमॅनीटेरिअन वेल्फेअर अँड रिसर्च फाऊंडेशन आणि कल्याण इपार्ची युथ याच्या संयुक्त विद्यमाने समाजाविषयीच्या आपल्या जबाबदारीचा एक भाग म्हणून, यावर्षी महाराष्ट्रातील विविध भागातील, निसर्गाच्या क्रूरतेमुळे व सरकारच्या गलिच्छ राजकारणामुळे ज्या शेतकर्यांना कर्जाच्या डोंगराखाली दबुन जाऊन अखेर आत्महत्या करावी लागली, जे शेतकरी अख्या देशाला खाऊ घालतात, त्यांच्या निराधार कुटुंबाला मदत करण्याची योजना आखली. त्या नुसार रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सेंट मेरी हायस्कूल, वर्सोवा, मुंबई येथे आयोजित समारंभात निराधार झालेल्या या कुटुंबाना आर्थिक मदत देण्याचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी जेष्ठ अभिनेते अंजान श्रीवास्तव, अभिनेत्री रागिणी खन्ना आणि संभावना सेठ यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले. जे सरकारने करायला हवे ते हि संस्था करतेय असे म्हणत अभिनेते अंजान श्रीवास्तव यांनी सरकारवर टीका केली. तसेच या उपक्रमात सर्वांनी आपापल्या परीने योगदान देवून शेतकऱ्यान प्रति आपली जबाबदारी निभवावी असेही त्यांनी सांगितले. जी कुटुंबे येऊ शकली नाहीत त्यांची मदत त्यांच्या घरी जावून देण्यात येईल असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
