बिबी सह चोर पांग्रा परिसरात विद्युत वितरण कंपनीच्या अंदाधुंद कारभाराला वैतागलेल्या जनतेने आज 8 एप्रिल रोजी अकरा वाजता बीबी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. बारा वाजेपर्यंत कार्यालयात कनिष्ठ अभियंता हजर नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला दिले. त्यांनी दिलेल्या निवेदनात बीबी येथे विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालय अंतर्गत जवळपास तीस गावे असून कर्मचारी संख्या अपुरी आहे. कित्येक गावांना लाईनमन सुद्धा नाही. त्यावर कळस म्हणजे तीन महिन्यापूर्वी कनिष्ठ अभियंता पाटील रुजू झाले पासून परिसरातील नागरिक व शेतकरी हवालदिल झाले आहे. कनिष्ठ अभियंता हे मेहकर या ठिकाणी राहतात. मेहकर ते बिबी हे 30 किलोमीटरचे आंतर आहे. त्यामुळे कार्यालयात पोहोचण्यासाठी त्यांना दुपारचे बारा ते एक वाजतात. त्यामुळे नागरिकांचे व शेतकऱ्यांचे कामे वेळेवर होत नाही. साहेबच कार्यालयात वेळेवर हजर राहत नसल्याने इतर कर्मचारी सुद्धा कामात कुचराई करतात. त्याचे परिणाम ग्राहकांना भोगावे लागत आहेत. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून तो वेळेवर सुरू होत नाही. विजेच्या कमी-अधिक दाबामुळे लोकांच्या घरातील विजेची उपकरणे वारंवार निकामी होत आहे. त्यांच्या विनाकारण भुर्दंड लोकांना सहन करावा लागत आहे. वीज बिल वेळेवर मिळत नाही. मिळाले तर रिडिंग नुसार बिल येत नाही. त्यात दुरुस्ती करून घेण्यासाठी साहेब वेळेवर उपलब्ध होत नाही. इत्यादी मागण्या केल्या आहेत. या मागण्या येत्या चार दिवसात पुर्ण न झाल्यास लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य संघटक लोकशासन आंदोलनाचे अॅड. योगेश जायभाये यांच्यासह बिबी परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
