बातमीपत्र

भांडुपमध्ये सुरु झालीय ब्लॅंकेट बँक,फोन कॉलवर गरजुंना मोफत ब्लॅंकेट देण्याची योजना

प्रतिनिधी - डिसेंबर पासून मुंबई मध्ये कडाक्याची थंडी जाणवू लागल्यापासून अनेक सामाजिक संस्था गोर गरिबांना ब्लॅंकेट वाटप करणेसारखे कार्यक्रम राबवत आहेत. परंतु निधी अभावी प्रत्येकाची गरज भागवणे शक्य होत नाही. अशातच मुंबई जिल्हा सह. हाऊसिंग फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक विशाल कडणे यांनी ब्लॅंकेट बँकचा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. सदर उपक्रमाअंतर्गत संस्थेच्या प्रतिनिधींना फोन कॉल्स केल्यास त्याची योग्य ती शहानिशा करून तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या हातून गरजू व्यक्तींपर्यंत मोफत ब्लॅंकेट पोहोचवले जाते. सदर उपक्रमामध्ये रात्री रस्त्यावर झोपून रात्र काढणारे आर्थिक दुर्बल घटक, परेल येथील टाटा हॉस्पिटलच्या बाहेर रात्रीत कुडकुडत उभे राहणारे रुग्नांचे नातेवाईक, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे रात्रपाळी करणारे सुरक्षा रक्षक इत्यादी व्यक्तींना प्राथमिकता दिलेली असून आजतागायत ५०० हुन अधिक गरजुंना सदर ब्लॅंकेट बँक अंतर्गत ब्लॅंकेट पोहोचवण्यात आल्याचे विशाल कडणे यांनी सांगितले. सदर वाटप करत असताना गरजू व्यक्तीची ओळख गुप्त राहावी म्हणून जाणूनबुजून कोणतेही फोटोग्राफी आम्ही करत नाही, अशा प्रकारचा प्रसिद्धीचा हव्यास टाळतो असे समितीचे सदस्य वैभव भुर्के यांनी सांगितले. सदरचा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा अशी विनंती विशाल कडणे यांनी केली आहे. भांडुप येथील दैवज्ञ चषक समन्वयक समितीने हि योजना आयोजित केली असून जात, धर्म, भाषा ह्या भीतीच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जोपासण्याचा प्रयत्न करणेबाबतचा प्रामाणिक उद्देश ह्या ब्लॅंकेट बँकचा असलेलेबाबत समिती सदस्य गौरव पोतदार यांनी सांगितले. फेब्रुवारी शेवट पर्यंत हा उपक्रम चालू राहणार असून अधिकाधिक गरजूपर्यंत हा उपक्रम पोहोचावा असा प्रयत्न सर्वानी करावा अशी विनंती विशाल कडणे यांनी केली आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा