राज्य शासनाच्या वतीने केवळ शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले असतानाच सोमवारी अचानक महापालिकेने संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केल्याने भांडुप पश्चिम येथील सर्व व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पसरले. त्यामुळे टेबेपाडा भागातील व्यापाऱ्यांनी याचा निषेध म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन केले. निर्बंध शिथिल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.अनलॉक नंतर सर्व व्यवहार मूळपदावर येत असतानाच पुन्हा कोरोनाने जोरदार धडक देऊन सर्व व्यवहार ठप्प होत असल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न सर्व जनतेसमोर उभा राहिला असून आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे मत अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.मुख्यमंत्री एक सांगतात आणि स्थानिक प्रशासन वेगळेच करतात याचा अर्थ काय,असा सवालही या वेळी उपस्थित केला.दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे दुकानातील कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.व्यापाऱ्यांनी कोणतीही घोषणाबाजी तसेच नियमांचे उल्लंघन केले नसल्याने कारवाई केली नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.
