लोणार तालुक्यातील बिबी - किनगांव जटु रोडवर सुरू असलेल्या स्टोन क्रशर प्लांट तात्काळ बंद करून परिसरातील नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी किनगाव जट्टू येथील हित चिंतकांनी राज्याच्या महसूल मंत्र्यांकडे लेखी निवेदना द्वारे मागणी केली आहे. अन्यथा ते ब्लास्टिंग करते वेळी खदाणीत बसून आमरण उपोषण करतील असा इशारा निवेदनातून दिला आहे.
लोणार तालुक्यांतील किनगांव जट्टू शिवारात दोन गिट्टी खदानाचे प्लांट आहेत. या प्लांटवर गेल्या अनेक वर्षांपासुन अवैधरीत्या उत्खनन होत आहे. सदरील प्लांट हे बिबी किनगांव जट्टू रोडवर असल्यामुळे तेथे तयार होत असलेल्या धूळीचे लोट नेहमीच रस्त्यावर असतात. रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकावर त्याचा परीणाम होऊन अनेकदा अपघात झाले आहेत. सदरील धूळीचे लोट आसपासच्या शेतकऱ्यांच्या पिकावर बसल्यामुळे उत्पन्नवर सुध्दा त्याचा परिणाम होतो. त्याच प्रमाणे धूळीचे कण हवेत मिसळून त्याचा परिणाम परिसरातील जनतेच्या आरोग्यावर सुध्दा होत आहे. येथे केल्या जाणाऱ्या ब्लास्टिंगच्या धक्क्यांनी लोकांच्या घरांना अक्षरशः तडे गेलेले आहेत. सदरील खदानीची जमिन ही काही प्रमाणात भाडेपट्ट्याची तर काही शासकीय आहेत. शासकीय नियमांची पायमल्ली करून उत्खनन व परस्पररित्या गौण खणिजाची अक्षरशः लुट चालू आहे. त्यामुळे शासनाला कोट्यावधीचा चूना लावला जात आहे. स्थानिक प्रशासन आपले आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतच्या तक्रारीवर कुठलीच कारवाई करत नसल्याने या गोष्टीला प्रतिबंध व्हावा म्हणून निवेदन कर्त्यांनी सदरील घटनेची तक्रार राज्याचे महसूलमंत्री यांचेकडे केली आहे. त्याची दखल घेऊन मा. मंत्री महोदयांनी सदरील तक्रारीची प्रत उचीत कारवाई करण्यासाठी संबंधित सचिव यांचे कडे पाठवीली आहे. त्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अन्यथा आम्ही जनआंदोलन छेडू व ब्लास्टिंग होते समई आमरण उपोषण करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
