बिबी ता लोणार दि 6
मांडवा तालुका लोणार हे चार हजार लोकसंख्येचे गाव असून या गावात सर्व धर्म समभाव या गावांमध्ये दिसून येते. या गावात देशसेवेत सध्या कार्यरत असलेले पंचेचाळीस ते पन्नास सैनिक आहेत. 24 वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले दोन सैनिकांचा भव्य अभिनव सत्कार गावकऱ्यांनी केला.
देशभक्ती च्या गप्पा सगळेच मारतात पण जेव्हा प्रत्यक्षात देशासाठी काही करायची वेळ येते तेव्हा मात्र मागे सरतात. परंतु मांडवा या गावातील तरुण सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्यात अग्रेसर आहेत. येथे सेवानिवृत्त सैनिकांची संख्या वीस ते पंचवीस इतकी आहे. गावांमध्ये सैनिक पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी एका माजी सैनिकाकडून मार्गदर्शन वर्ग चालविले जाते. देशसेवेसाठी मनोधैर्य वाढावे या हेतूने येथील माजी सैनिक गावातील तरुण पिढी ग्रामस्थांनी बैठक घेऊन सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक सैनिकांचे सत्कार करण्याचा ठराव घेतला. नुकतेच सेवानिवृत्त झालेले मांडवा येथील दत्तात्रय आनंदा खंडागळे जे सि ओ व बबन रामकिसन बुरकुल सुभेदार हे दोन शूर जवान सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचा भव्यदिव्य सत्कारही दिनांक 3 जानेवारीला गावकऱ्यांनी केला. 23 डिसेंबर 1994 रोजी अहमदनगर येथे सैन्यात दाखल झाले. 24 वर्षे देशसेवा केली. 1999 मध्ये त्यांनी कारगिल युद्धाचा सामना केला. व तीन वेळा प्रमोशन होऊन JCoपदावर सेवानिवृत्त झाले. गावामध्ये आल्याबरोबर गावातील लहान थोरांसह महिला, पुरुष, तरुण, माजी सैनिक व माँ करियर अकॅडमीचे मांडवा गावचे प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांनी गावात सैनिकांना घोड्यावर बसून संपूर्ण गावातून वाजत गाजत देशभक्ती च्या गाण्यात व नारे देत मिरवणूक काढली. प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना मानवंदना दिली. मिरवणूक मार्गावर गावातील महिलांनी रांगोळी काढून या सैनिकांना कुंकुमतिलक लावून भव्य स्वागत केले. सैनिकांनी प्राथमिक शिक्षणाची पहिली अक्षरे गिरवली त्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने जंगी स्वागत केले व भारत माता की जय व देशभक्ती गीतांची गाणी वाजवत त्यांना सभा मंडपात आणण्यात आले. सर्वप्रथम मांडवा येथील शहीदजवान योगेश दराडे यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त सैनिकांनी केले व भारतमातेच्या व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते दोन्ही सैनिकांचे पुष्पहार घालून यथोचित स्वागत करण्यात आले. तेथे जमलेल्या सर्वच माजी सैनिकांचे गावकऱ्यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तदनंतर मान्यवरांनी व शाळकरी मुलींनी सैनिकांचे कार्यावर मनोगत व्यक्त केले. यावेळी कुमारी श्वेता देवकर, पूजा बुर्कुल, प्रवीण गीते लोकजागर परिवार, विठ्ठल राव चव्हाण जिल्हा अध्यक्ष ग्रामसेवक युनियन बुलढाणा व कॅप्टन पवार यांनी सैनिकांच्या कर्तव्यावर भाषणे केली. अशा या सत्कार कार्यक्रमाने दुपारचे तीन वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत मांडवा गाव हे देश भक्तिमय वातावरणात अगदी न्हाऊन निघाले होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत श्रीकृष्ण शेठे सर, भाईदास माळी PSI बिबी, राजेश इंगळे मनसे परीवहन प्रदेश उपाध्यक्ष, सुधाकर डोंगरदीवे सर व परिसरातील आजी-माजी सैनिक तसेच सर्व समाज बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद भोकरे सर, संचालन प्रदीप तारे सर तर आभार प्रदर्शन समाधान नागरे सर यांनी केले.