बातमीपत्र

पुलवामा शहिदांच्या परिवारांना अल्ट्राटेकने दिला मदतीचा हात

देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहूती देणाऱ्या भारतमातेच्या सुपूत्रांना आपण सर्व भारतीय ते शहिद झाल्यावर मोठ्या आपुलकीने श्रद्धांजली देतो.अशा राष्ट्रीय संकटावेळी आपले भारतीयत्वही जागे होते मात्र शहिदांच्या परिवारांच घरचा कर्ता पुरुष गेल्याने झालेलं नुकसान आपल्या दुखावलेल्या भावनांपेक्षा कैकपटीने मोठं असतं. भारतासारख्या देशात राष्ट्ररक्षणासाठी शहिद होणाऱ्या परिवारांची भविष्यात आर्थिक बाजू कमकुवत झाल्याने होणारी वाताहत प्रत्येक भारतीयांसाठी लांछनास्पद असून ते लांछन लागू नये यासाठी अल्ट्राटेक परिवाराने पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या महाराष्ट्राच्या सुपूत्रांच्या परिवारांना आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून ही मदत केली असल्याची भावना अल्टाटेक सिमेंटचे विभाग प्रमुख पंकज मिश्रा यांनी व्यक्त केली. ते अल्ट्राटेक परिवाराद्वारे आयोजित अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील शहिद सी.आर.पी.एफ.जवानांच्या सांत्वना समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.आपण करीत असलेल्या व्यवसायात नफा कमविणे हे आपले उद्दिष्ट असले तरीही त्याच बरोबरीने भारतीय म्हणून आपली राष्ट्रीय व सामाजिक बांधीलकी जपणे हे आपले आद्य कर्तव्य असून आपला अल्ट्राटेक परिवार नेहमीच याकरिता अग्रेसर असावा असे मत त्यांनी पुढे मांडले.
           नुकत्याच 14 फेब्रुवारीला सी.आर.पी.एफ.जवानांवर पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती आतंकवादी हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजयसिंह भिकमसिंह राजपूत आणि लोणार येथील नितीन शिवाजी राठोड हे दोन जवान शहिद झाले होते. शहिद संजयसिंह राजपूत यांच्या परिवाराला अकोला जिल्ह्यातील अल्ट्राटेक सिमेंट विक्रेता असोसिएशनने १,११,१११ रुपयांची तर शहिद नितीन राठोड यांच्या परिवारास बुलढाणा जिल्हा विक्रेता असोसिएशनने १,००,००० रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली.
           अल्ट्राटेक सिमेंट ही भारतातील अग्रगण्य सिमेंट कंपनी असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असते. यावर्षी शेगाव येथे संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यात १२००० बिसलेरी पाणी बाँटलचे मोफत वितरण सोहळ्यात उपस्थित भाविकांना करण्यात आले होते.
        शहिद परिवारांसाठी सांत्वना निधी उभारणीसाठी अकोला आणि बुलढाणा जिल्हा विक्री अधिकारी अमित तिजारे, आशीष जगताप, प्रफुल्ल वथूरकर व अरविंद इंगळे यांनी सहकार्य केले.अल्ट्राटेक परिवाराच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा