लोणार तालुक्यातील चिखला काकड येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या भिंतीला चारही बाजूने तडे गेले आहेत. त्यामुळे या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले असून त्यांना आपला जीव मुठीत घेऊन वर्गखोलीत बसावे लागत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. भविष्यातील अनुचित घटना टाळण्यासाठी नव्याने वर्गखोली उभारण्यात यावी अशी मागणी पालक करीत आहेत. चिखला काकड या गावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा आहे. या शाळेत गावातील 175 विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून या शाळेतील इयत्ता पाचवीच्या वर्गखोली चारही बाजूने मोठे - मोठे तडे गेले असून भिंती जीर्ण झाल्या आहेत.या वर्ग खोल्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी अनेक वेळा प्रशासनाकडे केली आहे. परंतु या मागणीकडे प्रशासनाने हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी या जीर्ण खोल्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी चिखला काकडे येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम समाधान मांटे यांनी एक एप्रिल रोजी गट विकास अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
