जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील रेती घाटातून रेतीची अवैध वाहतूक लोणार तालुक्यातून होत असल्याची गुप्त माहिती बिबी पोलिसांना मिळाली. सदर घाटातील रेती लोणार तालुक्यातून वाहतूक करण्याची वाहनांन कोणतीही परवानगी नसताना ते वाहतूक करीत आहेत. त्यावरून बिबी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सदर वाहनांचा औरंगाबाद - मेहकर हायवेवर बिबी पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रामलखन ढाब्याजवळ पाठलाग करून चार टिप्पर व एक 407 पकडले. त्यात टिप्पर चालकाकडे प्रत्येकी दोन ब्रास राॅयल्टीच्या पावत्या तर 407 च्या चालकाकडे एक ब्रासची पावती दिसून आली. परंतु टिप्पर मध्ये चार ब्रास व 407 मध्ये दिड ब्रास रेतीची वाहतूक होत होती. त्यावरून पाचही वाहनांना बिबी पोलिस चौकीच्या मोकळ्या आवारात आणून लावले. वाहनातील रेती किती ब्रास आहे, यासाठी बीबी पोलीस स्टेशनने लोणार तहसीलदार यांना कळविले. त्यावर लोणार तहसीलचे कर्मचारी विलास नागरी आर आय, दादाराव साळवे तलाठी, एस एस मोरे तलाठी, यांनी सदर वाहनांचा पंचनामा करून सदर वाहने चालकांच्या सुपुर्द करून, पंचनामा वरिष्ठांकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे. तसेच मोटार वाहन निरीक्षक अविनाश भोपळे यांनी दिनांक 14 एप्रिल रोजी सदर वाहनांची कागदपत्रांची तपासणी व मालाचे वजन केले असता, क्षमतेपेक्षा जास्त माल आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. व पुढील दंडात्मक कारवाईसाठी सदर अहवाल हा वरिष्ठांकडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
