मनात धाडसी वृत्ती ठेवून कोणतीही भीती न बाळगता प्रत्येक विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतले पाहिजे,पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी तसे वागले पाहिजे .ज्या माझ्या समाजाने माझा गौरव केला, त्या समाजाच्या प्रत्येक कार्यात माझा कसा सहभाग असेल यासाठी पालकांनी आपल्या मुलाला समाजाच्या कार्याची माहिती करून देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार सुनील राऊत यांनी भांडुप पूर्व येथे केले.गाबीत समाज कांजूर-भांडूप पूर्व विभाग संस्थेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सुनील राऊत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी, व्यासपीठावर नगरसेविका सुवर्णा सहदेव करंजे, नगरसेविका सारिका मंगेश पवार, महाराष्ट्र गाबीत समाजाचे अध्यक्ष सुजय धुरत, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी राष्ट्रीय कबड्डीपटू व कबड्डी समालोचक सौ.वीणा खवळे शेलटकर, शाखाप्रमुख दीपक सावंत, गाबीत समाज कांजूर-भांडूप पूर्व विभागाचे अध्यक्ष गणेश फडके आदी मान्यवर उपस्थित होते
