बातमीपत्र

इंदिरानगरला स्वर्णगिरी मंदिराची प्रतिकृती;पहिल्या दिवसापासून भाविकांची अलोट गर्दी

नाशिक - प्रभाग 30मधील वडाळा- पाथर्डी रोडवर भाजपप्रणित श्री प्रतिष्ठान गणेश मंडळातर्फे यंदा तेलंगण मधील प्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वर स्वामी स्वर्णगिरी मंदिराची भव्य पर्यावरणपूरक प्रतिकृती साकारण्यात आली आहे.मंडळाचे संस्थापक,भाजपा गटनेता तथा नगरसेवक अॅड. श्याम बडोदे यांच्या पुढाकारातून हा देखावा उभारण्यात आला असून गेल्या सात वर्षांपासून येथे विविध भव्य देखावे साकारले जात आसून मंडळास मागील वर्षी विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशातील सुमारे ४५ कारागिरांनी दोन महिन्यांपासून दोन शिफ्टमध्ये अहोरात्र मेहनत घेऊन हा देखावा पूर्ण केला आहे. बांबू, लाकडी पट्ट्या,बॉटम आणि कापडाचा वापर करून संपूर्ण देखावा पर्यावरणपूरक पद्धतीने उभारला गेला आहे. देखाव्याची वैशिष्ट्ये - ८० बाय १३० फूट क्षेत्रफळ - ७० फूट उंच मंदिर प्रतिकृती - ३० फूट उंचीचे महाप्रवेशद्वार - ३० बाय ५२ फुटांचा पाण्याचा कुंड - शेषनागाच्या शय्येवर भगवान विष्णूंची मूर्ती - तिरुपती बालाजी, गणेश व महालक्ष्मीच्या मूर्ती भगवान विष्णूंच्या मूर्तीचे आकर्षण - पाण्याच्या कुंडाच्या मध्यभागी शेषनागाच्या शय्येवर विश्रांती घेत असलेले भगवान विष्णू यांची भव्य प्रतिकृती आहे. विष्णूंची दिव्य मुद्रा, शेषनागाचा फणा, मुकुट व अलंकार तसेच सभोवतालची भव्य मंदिररचना यामुळे भाविकांना स्वर्णगिरी मंदिरातील धार्मिक वातावरणाची अनुभूती मिळते. आकर्षक सजावट आणि प्रकाश योजनेमुळे ही रचना अधिक खुलून दिसत आहे. यासोबतच कुंभमेळ्याची माहिती देणारे प्रदर्शन आणि 'नशामुक्त भारत'चा संदेश देणारे प्रबोधनात्मक प्रदर्शनही तेथे सादर केले गेले आहे. देखावा पाहण्यासाठी पहिल्या दिवशी पासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.


आमच्यात सामील व्हा