झळांनी कोमेजलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी विहीरी व तलावांचे तळ गाठलेले असतांना सुध्दा नियोजन करून मका, शाळु, हरभरा व हळद या पिकांची लागवड केली. त्यांना फलधारणा तर कुठे फुलतच असतांना एकदमच थंडीची लाट आल्याने संपूर्ण पिक करपून पिवळे धमक पडले आहे. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी होरपळून निघाला आहे. कमी पावसामुळे खरीपाचे पिक हातचे गेले. जे आले त्याला योग्य भाव मिळत नाही. अशा अनेक संकटाना तोंड देत रब्बीच्या पिकावर थोडीफार आशा धरून असलेला परीसरातील शेतकरी गेल्या पाच सहा दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीने पिकांची पाने अक्षरशः भाजून गेली आहेत. पिके करपून पिवळीधम्मक पडून सुकू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने तो आता हवालदिल झाला आहे.
